शिरूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस; सहा वर्षीय बालकासह १७ जण जखमी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
शिरूर (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)
शहरातील गुजरमळा परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी सहा वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला करत चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ईशांत राजेंद्र दारोळे असे या जखमी मुलाचे नाव असून, त्याच्यावर सध्या अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासह एकूण १७ जणांना गेल्या काही दिवसांत कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर संतप्त महिलांनी एकत्र येऊन शिरूर नगरपरिषद प्रशासनाकडे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. यावेळी माजी सभापती विठ्ठलराव पवार, सामाजिक कार्यकर्त्या सविता दारोळे, सविता वाबळे, पूजा भास्कर हरिहर, रश्मी जगदाळे, दत्तात्रय शेलार आदी नागरिक उपस्थित होते.
सविता दारोळे म्हणाल्या, “माझा भाचा ईशांत घराबाहेर खेळत असताना दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. अशा प्रकारांवर प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.”
स्थानिक महिला सविता वाबळे आणि सविता भोंडवे यांनीही त्यांच्या मुलांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “गुजर कॉलनीत वारंवार कुत्र्यांचा त्रास होत असून, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरतात.”
माजी सभापती विठ्ठलराव पवार यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही दिला. त्यांनी सांगितले की, "काळ्या आणि पांढऱ्या रंगाची दोन कुत्री गेल्या काही महिन्यांपासून लहान मुलांवर हल्ले करत आहेत."
स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे यांनी सांगितले की, “पालिका मागील दोन वर्षांपासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करत आहे. गुजर कॉलनीतील दोन्ही कुत्र्यांना पकडण्याचा प्रयत्न झाला, मात्र ती कुत्री सापडलेली नाहीत. मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना अहवाल सादर करण्यात आला आहे.”
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, हे कुत्रे पहाटे व्यायामासाठी निघालेल्या नागरिकांना, दुचाकीस्वारांना व लहान मुलांना वारंवार त्रास देत आहेत. काही वेळा हे त्रास अपघातांनाही कारणीभूत ठरत आहेत.
नागरिकांची मागणी अशी:
नगरपरिषद प्रशासनाने तातडीने पावले उचलून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिकांचा रोष उफाळून येईल.
“ही वेळ येण्याआधी उपाययोजना व्हाव्यात,” अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
